Saturday, January 27, 2018

आठवणितला लाभे काका


लाभे काका, आता ज्याच्या नावातच लाभ आहे तो कसा असेल? आणि हा लाभ स्वतः साठी नाही तर इतरांसाठी. माझ्यासाठी लाभे काका म्हणजे काका, सुधाकर काका, केशव काका यांच्या बरोबर येणारं नावं म्हणजे लाभे काका.

लाभे काका म्हणजे
माझ्या वडीलांच्या जवळच्या मित्रांपैकी एक. आमच्यासाठी कुलकर्णी काका व लाभे काका,  एकदम घरच्या सारखे त्यामुळे लाभे-कुलकर्णी ही दोन नावं नाहीत ते एकच नाव आहे.  आज लाभे काका आपल्यात नाही याला ४-५ वर्ष लोटली पण लाभे काका आपल्यात नाही हे काही जाणवतच नाही. लाभे काका म्हंटलं की असं वाटतं की नागपूर ला गेलं की नक्की भेटेल. लाभे काका म्हणजे निखळ आनंद, प्रेम आणि निस्वार्थ. एक हाडाचा खरा कलंदर कलावंत!
बाबांशी गप्पा मारत बसलो नं की कळतं किंवा तेच सांगतात की अरे सर्व कलांशी आमची ओळख करून देणारा म्हणजे लाभे काका. आज आपण जे पंडित जितेंद्र अभषेकी ऐकतो किंवा बुवांचे शिष्य ऐकतो ना, त्याची पहिली ओळख कोणी करून दिली? लाभे काका! नाट्य संगीत, वसंतराव देशपांडे हे आम्हाला कोणामुळे कळले? विलास मुळे! नाट्य संगीत,  शास्त्रीय संगीताच्या प्रांतात आम्हाला घेऊन जाणारा कोण? विलास! म्हणजे अप्रत्यक्षपणे लाभे काकाचे उपकारच म्हण्टले पाहिजे. कारण मी माझ्या लहानपणी सिनेमाची गाणी ऐकली नाही असे नाही पण नाट्य संगीत खूप ऐकलं. म्हणजे माझा दुसऱ्या वर्गातला भाऊ फर्माईश करायचा की बाबा 'काटा रुते कुणाला लावा नं’. आमच्या घरात पंडितजी म्हणजे पं. जितेंद्र अभिषेकी हा विशेष आवडीचा विषय आहे. त्याच बरोबर पंडितजींचा ज्यांना ज्यांना स्पर्श झाला त्यांचं सोनं झालं मग ते शिष्य असो की अशोक पत्कीनसारखे सहकारी असो आज ते संगीत क्षेत्रात कुठल्या कुठे आहेत. आणि हो, काय योगायोग आहे, अशोक पत्की आणि लाभे काकात खूप साम्य आहे. म्हणजे कधी-कधी वाटतं की भाऊच तर नाही ना?  मग television वर जेव्हा जेव्हा अशोक पत्कीनना पाहतो तेव्हा तेव्हा लाभे काकाची आठवण आल्या शिवाय राहत नाही. लाभे काका म्हटलं की त्याची मूर्ती डोळ्यापुढे उभी राहते, त्याचा हसरा चेहरा, त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित असे. सावळा रंग, उंचीने थोडा ठेंगणा, अंगानी अगदी बारीक नाही पण लठ्ठही नव्हता आणि राहणी अत्यंत साधी होती. त्याच्या आवाज थोडा घोगरा होता, बोलायची एक शैली होती "अरे मुकुंदा ..... "असा त्याचा संवाद चालू होई. लाभे काका स्वभावानी खूप शांत होता. तापट तर अजिबात नाही. त्याला कधी खूप चिडलेला, वैतागलेला पहिल्याच आठवत नाही.    

लाभे काकाशी माझं नातं म्हणजे तो माझ्या वडिलांचा मित्र
, आणि नुसता मित्र नाही तर त्याचा आणि बाबांचा संबंध हा नाचणगाव पासून,  बाबांच्या लहानपणा पासून आहे. खरंतर लाभे काका बाबांना एक वर्ष सिनियर आणि लाभे काकाचा लहान भाऊ प्रकाश काका हा बाबांच्या बरोबरीचा, त्यांचा वर्ग मित्र. मग नंतर मात्र जेव्हा बाबा आणि लाभे काका दोघे बँकेत काम करू लागले, तेव्हा बाबा, लाभे काका आणि कुलकर्णी काका यांचं त्रिकुट जमलं! प्रकाश काका गमतीने म्हणतो देखील की विलास नी माझा मित्र हायजॅक केला!

लाभे काकाचं घरही आमच्या घरापासून खूप जवळ फार तर २ किमी. साधारण १९८१-८२ मध्ये आम्ही स्वावलंबी नगर मधे राहायला आलो आणि त्याच्या आसपासच लाभे काका सहकार नगर मधे राहायला आला. शाळेत असताना साधारण रविवारी वगैरे सोनेगाव तलावावर फिरण्याचा कार्यक्रम असे मग तो आटोपला की लाभे काका कडे आमचा एक अल्प किंव्हा दीर्घ थांबा ठरलेला असे. लाभे काकाचा विक्रम हा माझा मित्र. मग गप्पा
, खेळणे आणि मस्ती यान्ना ऊत येई.

माझा खरा लाभे काकाशी संबंध आला तो म्हणजे काश्मीर ट्रिप मधे. आम्ही दोन्ही कुटुंब जवळ जवळ १५-२० दिवस बरोबर होतो. ह्याच ट्रिप मध्ये प्रेमळ आणि कुटुंब वत्सल लाभे काका माहित झाला.
काश्मीर ट्रीपमध्ये नेमकं वैष्णव देवीच्या दर्शनाला कटरा मुक्कामी त्याला थोडं बरं नव्हतं म्हणून त्याला दर्शनाला येता आला नाही. पण आम्ही मंडळी जेव्हा थकून परत आलॊ तेव्हा त्यांनी आमच्या सगळयांच्या हाता पायाची मस्त मॉलिश करून दिली होती. 

लाभे काका हा खरा कलाकार माणूस, अनेक कला त्याच्या अंगी होत्या. उत्तम हस्ताक्षर
, चित्रकार (Painting + Sketching), काष्टकलाकार (Wood work artist), कवी,  a good  story teller. त्यानी नी केलेली अनेक चित्र त्यांच्या बैठकीच्या खोलीत व घरात इतर ठिकाणीही लावलेली होती.

त्याचं एक
wood arts प्रदर्शन बघण्याचं भाग्य मला मिळालं होतं. साधारण ९३-९५ सालची गोष्टं मी कॉलेज मध्ये होतो. बाबांना कामा निमित्त बाहेर गावी जाव लागणार होतं आणि नेमकं तेव्हाच ते प्रदर्शन पण होतं. त्याची हळहळ बाबांना होती मात्र इलाज नव्हता. पण बाबांनी मला आणि आईला सांगून ठेवलं होतं की विलासच्या काष्ठ कला प्रदर्शनाला नक्की जा, सांगून काय तर बजावून ठेवलं होतं त्यांनी. ठरल्या प्रमाणे आम्ही गेलो होतो, नसतो गेलो तर एका आनंदाला मुकलो असतो. प्रदर्शनात पोचलो तर बरीच गर्दी होती, तरी पण समस्त लाभे मंडळींनी आमच स्वागत केलं. एका मोठ्या दालनात साधारण ३०-३५ लहान मोठी ती वूड आर्टस् मांडली होती. प्रत्येकाचं बारसं केलेलं, म्हणजे प्रत्येक त्या कलाकृतीला नाव दिलेलं व त्याची छोटी माहिती पण होती. ३०-३५ वूड आर्टस् म्हणजे गम्मत नाही. ते लाकूड शोधा, हवा तसं कापा, थोडं आकारावर काम करावं लागत, तासावं लागतं, सॅण्ड पेपर चा २-४दा हात फिरवावा लागतो. मग मनाजोगं झालं की त्याला पॉलिश किंवा रंग द्यावा लागतो. या सगळयात प्रचंड मेहनत असते. असली प्रदर्शनी मांडायची म्हणजे, मांडणी वर काम करावं लागतं ते सगळं नाजूक काम एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्या एक ना दोन हजार भानगडी. पण कलाकार म्हण्टलं की या गोष्टी गौण होतात. त्या मेहनतीत आनंद असतो तो कलाकार मिळवतो, हा आनंद लाभे काका स्वतः तर घ्यायचाच पण इतरांनाही द्यायचा.
लाभे काकाच लिखाणही खूप छान असायचं हलकं फुलकं! जस मराठी छान तसच हिंदी देखील छान. पण खरं सांगू आम्हा विदर्भ किंवा नागपूर कराना हिंदीचं वावडं नाही, उलट विशेष प्रेम आहे. नागपूरच्या तरुण भारतच्या विषयांतर या सदरात लाभे काकाचे काही लेख छापून आले होते छान खुसखुशीत!

पण सुरवातीच्या त्याच्या कवितांमधून त्याच्या धडपडीचं चित्र त्या शब्दातून उमटलं आहे.
‘बेकारी’ आणि ‘अपुरं स्वप्नं’ या कवितांमधून ते प्रतिबिंब उमटल आहे, वाचताना 'आईगं' असं म्हणावसं वाटलं नाही तर नवल. हिंदीतून लिहिलेल्या काही लेखात सरकारी कामाचं प्रतिबिंब उमटलं आहे. सरकारी शिथिलता आणि त्याचा लोक कसे फायदा उचलत याचं चित्रण लाभे काकांनी कधी टपली तर कधी धपाटा लगावत केलं आहे. खरे अफलातून आहेत त्याचे कार्टून्स! एकदम भन्नाट!! त्या काळातल्या जाहिराती, दूरदर्शन, आजूबाजूच वातावरण या सगळयाचा परामर्श त्यानी त्याच्या या सगळ्या कलांमधून घेतला आहे आणि खासियत ही की हसत हसत वाट लावली आहे. त्याचे कार्टून पाहून अस वाटत की त्यांनी जर सातत्यानी ते केलं असतं तर नागपूरकरांना एक मस्त कार्टूनिस्ट मिळाला असता. त्याच्या सुंदर हस्ताक्षरातले काही लेख, कविता विक्रम नी संग्रही ठेवल्या आहेत. त्यातून त्याच्या सुंदर हस्ताक्षराचं दर्शन होतं. जसं देवनागरी तसच इंग्लीशचही अक्षर सुरेख आहे.

दर वर्षी नागपुरातल्या छत्रपती सेवा प्रतिष्ठान साठी स्वहस्ताक्षरात तो प्रशस्ती पत्र लिहीत असे. तरुणभारतच्या ज्ञानरंजन स्पर्धेचा तीनदा विजेता होता! दूरदर्शनच्या जमान्यात
quiz time, अंक अजूबे आणि अलीकडील कौन बनेगा करोडपती हयातील उत्तरे तो अचूक द्यायचा. उत्तम कॅरम खेळायचा आणि ब्रिज देखील. एखाद्यानं आयुष्यात काय काय करावं? लाभे काका कडे पाहिलं की त्याचं आश्चर्य वाटतं. नवीन काहीतरी करायची आणि शिकायची त्याची इच्छा, इच्छे पेक्षा भूक ही कायम होती. कलेचे अनेक प्रान्त तो फिरला, अनेक गोष्टी explore केल्या.

माझं लग्न झालं तेव्हा मी गोरेगावला राहत होतो व माझा लहान भाऊ हर्षदही आमच्या बरोबरच होता. तेव्हा आम्ही कोजागिरी करायचं ठरवलं सगळी नागपूर गॅंग जमलो होतो
, विक्रमलाही बोलावले होते आणि विक्रम आवर्जून आलाही होता. लाभे काकाला याचा फार आनंद झाला होता. की चला पुढली पिढीसुद्धा नातं टिकवायचा प्रयत्न करते आहे!
खरंतर असं वाटत की काळाच्या खूप आधी निघून गेला लाभे काका. मला जेव्हा लाभे काकाला देवाज्ञा झाल्याच कळलं तेव्हा मी भारता बाहेर होतो, पहिल्यांदा त्या बातमीवर विश्वासच बसत नव्हता, पुढले चार दिवस काही सुचत नव्हतं. पण....शेवटी 

जरामरण यांतुन सुटला कोण प्राणिजात?
दुःखमुक्त जगला का रे कुणी जीवनांत?

शेवट लाभे काका सारखी माणसं कधी जात नसतात ती आठवणींच्या स्वरूपात आपल्यातच असतात आणि त्याच्या कामातून, लेखातून ते सतत आपल्या बरोबर असल्याची जाणीव करून देतात आणि खुणावतात मी असा जगलो. तुम्ही पण जगा छंद जोपासा, त्यासाठी कष्ट करा धडपड करा. 

अमोल दांडेकर
Jan 28 2018
(Jan 29, लाभे काकाचा आज पाचवा स्मृतिदिन त्यानिमित्त)

ऋण निर्देश: विक्रम लाभे


Gallery
#कविता
अपुरे स्वप्न 



बेकारी 


#हस्ताक्षर 



पढिये और मुस्कुराईए 







# व्यंग चित्रकार लाभे काका



#चित्रकार लाभे काका